ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रात्री भारताचे पंतप्रधान नरेंद् मोदींशी फोनवरून चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन केले. व्हाइट हाऊसने हे वृत्त दिले आहे. व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव शॉन स्पायसर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की ट्रम्प यांनी मोदींना फोन करून निवडणुकीतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने लक्षणीय यश मिळवले होते. या पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपाने सरकार स्थापन केले होते. मात्र पंजाबमध्ये भाजपाला काँग्रेसकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता.
या निवडणुका भाजपाने स्थानिक नेतृत्वाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दणदणीत यश मिळाले होते. पैकी उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 14 वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन करण्यात भाजपाने यश मिळवले होते. मोदींनी घेतलेल्या नोटबंदीसारख्या कठोर निर्णयानंतर भाजपाला मिळालेले यश मोदींच्या नेतृत्वामुळे मिळाल्याचे मानले जात आहे.
US President @realDonaldTrump calls Prime Minister @narendramodi to congratulate him on his electoral victory, says White House.— Press Trust of India (@PTI_News) March 27, 2017