वॉशिंग्टन - कोरोनामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था... कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे वाढत चाललेली मृतांची संख्या... कॅपिटॉल हिलवर अलीकडेच झालेला हल्ला... अशी चारही बाजूंनी निराशाजनक परिस्थिती असताना व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सोहळ्याला पाठ दाखवली. मात्र, मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे अभिनंदन केले आहे.
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संबंधात अधिक दृढता आणि भागिदारीत वाढ करण्यासाठी, दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे अभिनंदनही केलंय. तसेच, बायडन यांच्यासमवेत काम करत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील भागिदारीला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी संकल्पित आहे. भारत व अमेरिकेची भागिदारी आपल्यासाठी लाभदायक असल्याचंही मोदी म्हणाले. दरम्यान, हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचेही मोदींनी अभिनंदन केले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांबाबत कडक भूमिका घेतली होती. स्थलांतरितांमुळे अमेरिकेतील स्थानिक नागरिकांच्या रोजगार संधींवर गदा येते, असा ट्रम्प यांचा आक्षेप होता. त्यामुळे अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या कमी कशी होईल, याप्रकारची धोरणे त्यांनी गेली चार वर्षे राबविली. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जो बायडेन स्थलांतर विधेयकाला लगेचच मंजुरी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १ कोटी १० लाख स्थलांतरितांना त्या देशाचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशा नागरिकांमध्ये पाच लाख भारतीयवंशीयांचाही समावेश आहे.
बायडेन यांच्या पहिल्या भाषणाशी भारतीय संबंध -जो बायडेन यांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिले भाषण आणि त्यांच्या भाषणाशी भारताचे असलेला संबंध भारतीयांसाठी विशेष असेच आहे. बायडेन यांचे पहिले वहिले भाषण तयार करणाऱ्या गटाचे प्रमुख आहेत भारतीय वंशाचे विनय रेड्डी. त्यांनी यापूर्वीही निवडणूक प्रचारादरम्यान बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यासाठी भाषणे लिहिली आहेत. विनय रेड्डी हे ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉचे माजी विद्यार्थी आहे.