मुंबई : नौदल अधिका-यांच्या घरांसाठी एक इंच जागा देणार नसल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यानंतर आता काँग्रेसने मात्र पत्र लिहून भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे.२६/११ रोजी मुंबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास १६६ लोकांचा मृत्यू झाला आणि ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. भारतमातेचे शूरवीर सुपुत्र असलेले लष्करी अधिकारी आणि पोलिसांनी मुंबईच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली. हा दहशतवादी हल्ला समुद्रमार्गे झाला होता. त्यामुळे या मार्गाचा वापर मुंबईवर हल्ला करण्यासाठी पुन्हा होऊ शकतो, हे गुप्तचर विभागाच्या अनेक अहवालांतून स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुख लक्ष्यांमध्ये मुंबई अग्रस्थानी आहे, हेसुद्धा स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षिततेकरिता कोणतीही हयगय होता कामा नये, हे अभिप्रेत असणे साहजिकच आहे. त्यासाठी आपण मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेलिपॅड असेल किंवा तरंगते हॉटेल यासारख्या प्रकल्पांना आक्षेप घेऊन आपली जबाबदारी पार पाडल्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करतो, असे काँग्रेसने पत्रात म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेकरिता कोणी कितीही मोठा असेल तरी नौदलाने कोणत्याही दबावाखाली येऊ नये हीच भारतीय जनतेची अपेक्षा आपल्या माध्यमातून पूर्ण होत आहे, असे पत्रात नमूद केले आहे. आपण जिवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करीत आहात याचा सार्थ अभिमान सर्वांना आहे, असेही सचिन सावंत यांनी काँग्रेस पक्षातर्फे लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
काँग्रेसने ‘त्या’ टीकेनंतर केले नौदलाचे अभिनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 4:39 AM