नवी दिल्ली - आपल्या एकापेक्षा एक जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे ‘ब्रह्मास्र’ मानली जाणारी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर जेट आज भारतभूमीवर सुखरूप उतरली. फ्रान्सहून तब्बल सात हजार किलोमीटरचं अंतर कापून आलेल्या या पाच विमानांचं देशभरातून मनःपूर्वक स्वागत होतंय. भारताचं सामरिक सामर्थ्य राफेलच्या आगमनानं प्रचंड वाढलंय आणि स्वाभाविकच देशवासीयांचं मनोधैर्य उंचावलंय. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही राफेलच्या आगमनाबद्दल भारतीय वायूसेनेचं अभिनंदन केलंय.
राफेलच्या आगमनाने देशाचा ऊर अभिमानानं भरून आलेला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संस्कृतमधील एका राष्ट्रभक्तिपर सुभाषितातून राफेलचं स्वागत केलं.
राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम्, राष्ट्ररक्षासमं यज्ञो,दृष्टो नैव च नैव च।।नभः स्पृशं दीप्तम्... स्वागतम्!
असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. राष्ट्ररक्षणासारखं पुण्य नाही, राष्ट्ररक्षणासारखं व्रत नाही आणि राष्ट्ररक्षणासारखा यज्ञ नाही, असा या संस्कृत श्लोकाचा आशय आहे. केंद्रात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही राफेलच्या भारतभूमीवर अवतरण्याचे स्वागत करताना, भारतीय वायू दलाचं अभिनंदन केलं आहे. मात्र, त्यासोबतच केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय वायू दलाचं अभिनंदन करत, मोदी सरकारला ३ प्रश्न विचारले आहेत. भारत सरकार या प्रश्नांचं उत्तर देऊ शकेल का, असे राहुल यांनी म्हटलंय.
526 कोटी रुपयांचं राफेल विमान 1670 कोटी रुपयांना का खरेदी केलं?126 ऐवजी केवळ 36 राफेल विमानंच का खरेदी करण्यात येत आहेत?HAL ऐवजी दिवाळखोर अनिल यांस 30 हजार कोटींचं कॉन्ट्रॅक्ट का देण्यात आलंय?
असे तीन प्रश्न राहुल गांधींनी विचारले आहेत. राफेल खरेदीवरुन यापूर्वीही काँग्रेसने मोदी सरकारला संसंदेत प्रश्न विचारले होते. तसेच, या खेरदीत मोठा घोटाळा असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता.