मुंबई - विश्वचषक स्पर्धेतील सर्वात हीट समजला जाणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला मात देत एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर, भारतात सर्वत्र विजयाचे सेलिब्रेशन सुरु झाले. बॉलिवूड, राजकारणी आणि सर्वसामान्य जनतेनंही या विजयाचा आनंद व्यक्त केला. पाकिस्तानला कशाप्रकारे धूळ चारली, याबाबात भारतीय सोशल मीडियावरुन शब्दांचे फटाके फुटत होते. त्यातच, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही टीम इंडियाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.
अमित शहा यांनी ट्विटरवरुन भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना, भारताचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक आणि निकाल पुन्हा तोच... असे ट्विट केले आहे. आपल्या स्टाईलनेच अमित शहा यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेने पाकिस्तानच्या हद्दीतील बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. त्यातच, नुकतेच मोदींची हजेरी लावलेल्या परिषदेतही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जाणीवपूर्वक टाळल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, या सामन्याकडे एका युद्धाप्रमाणे पाहिले जात होते. मात्र, भारताने सहजच पाकिस्तानला लोळवले, आणि विश्वचषक स्पर्धेत सलग सातव्यांदा विजय मिळविण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्यानंतर, सोशल मीडियावरुन पुन्हा एका पाकिस्तानवर शाब्दीक स्ट्राईक सुरू झाले. तर, भारताचा पाकिस्तानवर सेव्हन स्ट्राईक असेही म्हटले गेले. त्यातच, अमित शहांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे.
जागतिक क्रिकेटमधील ‘हायव्होल्टेज’ सामन्यात भारतीय संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी लोळवले. यासह भारताने विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना त्यांचा या स्पर्धेत सलग सातव्यंदा पराभव केला. भारताने 50 षटकात 5 बाद 336 धावा उभारल्यानंतर पाकिस्तानचा डाव 40 षटकात 6 बाद 212 धावांत रोखला गेला. पावसाच्या व्यत्ययानंतर पाकला अखेरच्या 5 षटकात 136 धावांचे ‘सुधारित’ आव्हान मिळाले होते. मात्र, त्यांना केवळ 46 धावाच करता आल्या. सर्वात महत्त्वाचे या धमाकेदार विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकविरुद्ध झालेल्या पराभवाची व्याजासहीत परतफेडही केली.