राहुल गांधींचा मराठी बाणा; मराठीतून केला शिवाजी महाराजांना मुजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 12:59 PM2018-02-19T12:59:06+5:302018-02-19T12:59:10+5:30
राहुल गांधींनी त्यांच्या एका कृतीमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
नवी दिल्ली: शिवजयंतीनिमित्त आज देशभरातील राजकीय नेत्यांकडून सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे आणि त्यांच्या कार्याची महती सांगणारे संदेश पोस्ट केले जात आहेत. या सगळ्या राजकीय नेत्यांमध्ये राहुल गांधींनी त्यांच्या एका कृतीमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एरवी प्रसारमाध्यमांशी हिंदी आणि इंग्रजीतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधणाऱ्या राहुल यांनी आज चक्क मराठी भाषेतून ट्विट केले आहे.
रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा! pic.twitter.com/wuzArakrpw
— Office of RG (@OfficeOfRG) February 19, 2018
रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा!, असा संदेश राहुल यांनी ट्विट केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राहुल गांधी यांच्या देहबोलीत आणि भाषणांमध्ये कमालीचा आत्मविश्वास जाणवू लागला आहे. अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठात केलेल्या भाषणानंतर राहुल यांच्यातील हा बदल अधिक ठळकपणे दिसून आला होता. राजकीय सभांमध्ये ते अधिक आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. याचा प्रतिबिंब त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटसवर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी सरकारवर टीका करताना आपल्या नेमक्या आणि मर्मभेदी टिप्पणीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तत्पूर्वी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. मोदींनी एक व्हिडीओ पोस्ट करत महाराजांच्या जयंतीनिमित्त एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे. शिवाजी महाराजांसारखे शूर आणि महान व्यक्तीमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे. शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही, असे मोदींनी या व्हिडीओत म्हटले आहे.
तसेच या व्हिडीओच्या माध्यमातून मोदींनी देशातील जनतेला एक आवाहनही केले आहे. त्यासाठी मोदींच्या पूर्वीच्या भाषणांचा संदर्भ वापरण्यात आला आहे. दरदिवशी प्रत्येक भारतीयाने किमान एका व्यक्तीची सेवा करावी, तरच या सेवेच्या माध्यमातून आपण महाराजांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करु शकतो, असं ते एका भाषणात म्हणाले होते. याशिवाय, मोदींनी त्यांच्या भाषणादरम्यान ‘जय भवानी जय शिवाजी’ केलेल्या जयघोषाचाही व्हिडीओमध्ये कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. आज शिवजयंतीनिमित्त राज्यभरात शासकीय कार्यक्रमांसह अनेक संस्थांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.