नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान राजधानी दिल्लीतील दंगलीच्या मुद्द्यावरून गुरूवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज सतत तहकूब करावे लागले. दरम्यान, लोकसभेत सभापतींकडून पत्र काढून घेतल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
गुरुवारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या या सात खासदारांना निलंबित केले. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रथापन, डीन कुरियाकोसे, आर. उन्निथन, माणिकम टागोर, बेनी बेहनन आणि गुरजितसिंग औजला यांचा समावेश आहे. या खासदारांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी लोकसभेमधून निलंबित केले आहे.