नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांमध्ये झालेल्या जागावाटपापाठोपाठ आज गुजरात, हरयाणा आणि दिल्लीतील लोकसभेच्या ४३ जागांवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीदरम्यान जागावाटपावर समझोता झाला. पंजाबमध्ये सत्ताधारी ‘आप’ आणि काँग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत.
‘आप’चे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात झालेल्या दोन बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. याविषयी लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
जागावाटपाच्या समझोत्यानुसार नवी दिल्ली, उत्तर-पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘आप’चे उमेदवार लढतील, तर काँग्रेस पूर्व दिल्ली, उत्तर-पूर्व दिल्ली आणि चांदणी चौक येथे निवडणूक लढेल. काँग्रेसने ‘आप’साठी गुजरातमध्ये दोन जागा आणि हरयाणामध्ये एक जागा सोडण्याचे ठरविले आहे.