Congress Acharya Pramod Krishnam News: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. ज्या राज्यातून ही यात्रा जात आहे, तिथे काँग्रेसला काही ना काही फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेससाठी काम केलेले नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. तर अनेक काँग्रेस नेते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. एकूणच काँग्रेसची परिस्थिती बिकट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, एका काँग्रेस नेत्याने राहुल गांधी भेटीवरून पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
राहुल गांधी यांना गेल्या वर्षभरापासून भेटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्यापही यश आलेले नाही. योग्य पद्धतीने संपर्कही होत नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आहेत. कदाचित ते व्यस्त असतील. अधिक कोणाला भेटायची इच्छा नसेल. माझा संदेश राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवला जात नसेल, असा दावा काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. अलीकडेच आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीचा अनुभवही आचार्य कृष्णम यांनी शेअर केला.
पंतप्रधान मोदी यांना भेटणे सोपे आहे पण राहुल गांधींना नाही
आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे सोपे आहे, पण राहुल गांधी यांना नाही. पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी पीएमओ कार्यालयात वेळ मागितली होती. ४ दिवसांत कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची वेळ मिळाली, असे त्यांनी नमूद केले. अलीकडेच श्री कल्कि धाम भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनाही भेटले होते.
दरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका केली. पक्षातील बड्या नेत्यांनी आपली मर्यादा आणि भाषा सांभाळली पाहिजे. कार्यकर्त्यांमधून पक्ष निर्माण होतो. कार्यकर्ता मेहनती आणि धाडसी असतो. हा कोणा एका पक्षाचा प्रश्न नाही. सर्वच पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच पायावर उभे आहेत. काँग्रेसही कार्यकर्त्यांच्या पायावर उभा आहे. ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ती केवळ मलाच नाही तर सर्व कार्यकर्त्यांना दुखावणारी होती. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.