Congress Acharya Pramod Krishnam: हा काँग्रेसचा पराभव नाही. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये असे नेते सामील झाले आहेत, ज्यांचा प्रभाव पक्षात जास्त आहे. महत्त्वाच्या निर्णयात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे काँग्रेसची ओळख आता सनातनविरोधी म्हणून होऊ लागली आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. काँग्रेसने अशा नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला नाही, तर पक्षाची अवस्था एमआयएम पक्षासारखी होईल, असे स्पष्ट मत काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस मोठ्या फरकाने पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. सुरुवातीचे कल पाहता या तीनही राज्यात भाजप स्पष्ट बहुमताजवळ आहे. तर तेलंगणमध्ये बीआरएस पक्षाला धक्का देत, काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. यावर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पक्षातील काही नेत्यांना जबाबदार धरले असून, या नेत्यांना पक्षातून काढले पाहिजे, असे म्हटले आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाला यावर गंभीरपणे विचार करावा लागेल
काँग्रेस पक्षात आलेल्या काही नेत्यांनी पक्षाला डाव्या विचारसरणीकडे नेले आहे. महात्मा गांधी यांचा काँग्रेस पक्ष वेगळ्या वाटेवर जाऊ लागला आहे. महात्मा गांधींच्या सभेची सुरुवात ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम’ या ओळींनी व्हायची. आज त्या काँग्रेसला सनातन धर्माच्या विरोधी पक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे दुर्दैवी आहे. काँग्रेसने अशा नेत्यांना वेळीच बाजूला केले नाही तर काँग्रेसचे अवस्था लवकरच एमआयएम या पक्षासारखी होईल. काँग्रेसच्या नेतृत्वाला यावर गंभीरपणे विचार करावा लागेल, असा सल्लाही आचार्यांनी दिला आहे.
सनातन धर्माच्या विरोधामुळे पक्ष बुडाला
काँग्रेसला महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची काँग्रेस राहू द्यावे लागेल. काँग्रेसला मार्क्सच्या विचारांवर जे नेते नेऊ पाहत आहेत. त्यांना लवकर बाजूला करावे लागेल. भारत भावनाप्रधान देश आहे. सनातन धर्माच्या विरोधामुळे पक्ष बुडाला. जातीवादाच्या राजकारणाला या देशाने कधीही स्वीकारले नाही, असे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ६ सप्टेंबर १९९० रोजी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी संसदेत भाषण केले. ते एकदा सर्वांनी ऐकले पाहिजे. हा देश जर जातीयवादी असता तर माजी पंतप्रधान व्हिपी सिंह यांना घरोघरी पुजले गेले असते. त्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करून जातीचे कार्ड खेळले. त्यांच्यापेक्षा मोठा जातीवादी नाही. पण त्यांची अवस्था काय झाली? हे देशाने पाहिले. आम्ही सनातन धर्माचा विरोध केल्यामुळे पराभूत झालो, हे तथ्य आहे. ज्या राज्यात काँग्रेसचा पराभव झाला आहे, त्या राज्यातील प्रभारींनी तत्काळी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली.