भोपाळ - छत्तीसगड, मिझोरम, तेलंगणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्व राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसलीय. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली दिसत असताना काँग्रेसचे नेतेमंडळीच पक्षाच्या अडचणी वाढवताहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. जनतेशी संवाद साधताना काँग्रेस आमदाराची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.
'पक्षाला भलेही मतं न मिळो,पण माझी व्हॉटबँक माझ्यासोबत राहो', असेच काहीसे विधान काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जीतू पटवारी करताना दिसले आहेत. राउ येथील काँग्रेस आमदार जीतू पटवारी यांनी सोमवारी मॉर्निंग वॉकदरम्यान आपल्या मतदारसंघातील जनतेची भेट घेतली. यावेळेस त्यांनी लोकांना मतं देण्यासाठी आवाहन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
(माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात- दिग्विजय सिंह)
पण यावेळेस त्यांनी असेही काही विधान केले की यामुळे पटवारी सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. 'तुम्ही माझी काळजी घ्या, तुम्हाला माझी इज्जत ठेवायची आहे... पार्टी गेली तेल लावत', असे विधान पटवारी यांनी मतदारांशी संवाद साधताना केले. यासंबंधीचा पटवारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ स्वतः जीतू यांनी फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडीओवरुन नेटीझन्सकडून त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.
तर दुसरीकडे यासंदर्भात स्पष्टीकरण देत असताना जीतू पटवारी यांनी म्हटले की, माझ्या शब्दांचा चुकीच्या पद्घतीनं प्रचार केला जात आहे. क्षेत्रातील वरिष्ठ सदस्यदेखील माझ्या कुटुंबातील सदस्यासमान आहेत. भाजपाकडून माझी प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जनसंपर्कावेळी भाजपासाठी मी या शब्दांचा वापर केला होता, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आपल्याच नेत्यांच्या विधानांमुळे अडचणी निर्माण होत असल्यानं काँग्रेस चिंतेत आहे. माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात, असं विधान काँग्रसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ''माझ्या भाषणांमुळे काँग्रेसचं नुकसान होतं. त्यामुळेच मी रॅली आणि जनसभांना संबोधित करत नाही'', असं सिंह म्हणाले होते. मध्य प्रदेशात दिग्विजय सिंह यांचा चांगला प्रभाव आहे आणि त्यांच्या विधानामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकले असते, यामुळे पार्टीकडून यासंदर्भात कठोर भूमिका स्वीकारण्यात आली.