“ममता बॅनर्जींकडून आम्ही भीक मागितलेली नाही”; जागावाटपावरुन अधीर रंजन चौधरी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 04:35 PM2024-01-04T16:35:40+5:302024-01-04T16:37:22+5:30
Lok Sabha Election 2024: काँग्रेसने टीएमसीच्या या फॉर्म्युल्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना आता चाचपणी करण्यास सुरुवात केली असून, जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रित येऊन जागावाटप कसे असू शकेल, यावर खल सुरू केला आहे. यातच आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला दोन जागांची ऑफर दिल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून काँग्रेस नेते आणि पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी संताप व्यक्त केला असून, ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.
इंडिया आघाडीत जागावाटपावरून समन्वयापूर्वीच बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, ममता बॅनर्जींना युती नको आहे. ममता बॅनर्जी मोदींची सेवा करण्यात मग्न आहे, अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली. सन २०१९ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये ४३ टक्के मताधिक्यासह २२ जागांवर विजय मिळाला होता. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस प्रबळ पक्ष असून, जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना मिळावा, असे पक्षातील नेत्यांना वाटते.
आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो
काँग्रेसने टीएमसीच्या या फॉर्म्युल्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्याकडे कोणी भीक मागितली हे मला माहिती नाही. आम्ही भीक मागायला गेलो नाही. ममता स्वत: सांगत आहेत की, त्यांना युती हवी आहे. आम्हाला ममतांच्या दयेची गरज नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो, असा इशारा अधीर रंजन चौधरी यांनी दिला.
दरम्यान, दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत, असा प्रस्ताव दिला होता. त्याला अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, याबाबत शिक्कामोर्तब झालेले नाही.