नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवरून तापलेले दिसत आहे. इंधनदरवाढ ते महागाईपर्यंतच्या अनेक विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या एका आवाहनाची भर पडली आहे. यावरून काँग्रेसचे नेते आणि खासदार अधिर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याची टीका केली आहे.
वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा, इंग्रजीत नाही, असा सल्ला गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे की, सरकार चालवण्याचे माध्यम हे राजभाषा आहे आणि त्यामुळे हिंदीचे महत्त्व नक्कीच वाढेल. आता वेळ आली आहे की राजभाषेला देशाच्या एकात्मतेचा महत्त्वाचा भाग बनवण्याची, असेही शाह यांनी म्हटले होते. यावरून काँग्रेसने हल्लाबोल केला आहे.
हा सांस्कृतिक दहशतवाद आहे
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले, आम्ही हे स्वीकारू शकत नाही. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे, अशी टीका चौधरी यांनी केली. दुसरीकडे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनीही अमित शाह यांच्यावर टीका केली. आमची घरे तोडून नका मिस्टर होम मिनिस्टर. We dare you… हिंदीची बळजबरी थांबवा. आम्हाला आमची विविधता प्रिय आहे, आम्हाला आमच्या मातृभाषेविषयी प्रेम आहे, आम्हाला आमची ओळख प्रिय आहे, असे प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, जेव्हा इतर भाषा बोलणारे राज्यांचे नागरिक एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ते भारताच्या भाषेत असले पाहिजे, असे अमित शाह यांनी संसदीय अधिकृत भाषा समितीच्या ३७ व्या बैठकीत सांगितले. अमित शाह यांनी हिंदी भाषा ही इंग्रजीला पर्याय म्हणून वापरायला हवी, स्थानिक भाषांना नाही, असे स्पष्ट केले. इतर स्थानिक भाषांमधील शब्द स्वीकारून हिंदी भाषा अधिक लवचिक बनवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.