“माझी गरज नसेल तर मी निघून जातो”; नवीन संसदेत पोहोचलेले अधीर रंजन चौधरी का झाले नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 04:21 PM2023-09-17T16:21:48+5:302023-09-17T16:24:48+5:30
Adhir Ranjan Choudhary New Parliament: नवीन संसद भवन येथील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली.
Adhir Ranjan Choudhary New Parliament: संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज नवीन संसद भवनाच्या 'गज द्वार' येथे राष्ट्रध्वज फडकावला. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी हा विशेष कार्यक्रम झाला. कारण या अधिवेशनात संसदेचे कामकाज जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात हलवले जाणार आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांसह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आणि माझी गरज नसेल, तर निघून जातो, असेही सुनावले.
ध्वजारोहणाच्या प्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन यांच्यासह विविध पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार, विविध पक्षांचे नेतेही उपस्थित होते. अधीर रंजन चौधरी यांच्यासह फारूख अब्दुल्ला हेही उपस्थित होते. या सोहळ्याला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित नव्हते. मीडियाशी बोलताना अधीर रंजन चौधरी यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
माझी गरज नसेल तर मी निघून जातो
अधीर रंजन चौधरी यांना मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित न राहिल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. माझी इथे गरज नसेल तर मला कळवा, मी निघून जाईन. जे इथे आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. मी इथे आहे, ते पुरेसे नाही का? असा उलटप्रश्न अधीर रंजन चौधरी यांनी मीडियाला विचारला. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. या कार्यक्रमाचे निमंत्रण उशिरा मिळाल्याचा आरोप करत, राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांना पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली.
दरम्यान, हा कार्यक्रम १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आहे. १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता खरगेजींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आमच्या काँग्रेस कार्यकारिणीची आधीच ठरलेली बैठक १६-१७ सप्टेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे, हे सरकारला आधीच माहिती होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली.