“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 19:02 IST2024-05-01T19:00:59+5:302024-05-01T19:02:06+5:30
Congress Adhir Ranjan Chowdhury News: अधीर रंजन चौधरी भाजपाचे स्टार प्रचारक आहेत, अशी टीका तृणमूलकडून करण्यात आली आहे.

“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
Congress Adhir Ranjan Chowdhury News: लोकसभा निवडणूक देशभरात रंगतदार स्थितीत आहे. सत्ताधारी आणि विरोधक जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भाजपामधील इन्कमिंग वाढताना दिसत आहे. तर संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात आहे, या दाव्यांवरच विरोधकांचा जोरदार प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे. यातच काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी एक अजब विधान केले आहे. तृणमूल काँग्रेसला मतदान करण्यापेक्षा भाजपाला मत देणे चांगले, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.
एका प्रचारसभेत अधीर रंजन चौधरी बोलत होते. सुष्मिता देव यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. सुष्मिता देव तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. अधीर रंजन चौधरी यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसला का मत द्यायचे, भाजपाला मत देणे केव्हाही चांगले, असे विधान अधीर रंजन चौधरी यांनी केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अधीर रंजन चौधरी भाजपाचे स्टार प्रचारक असल्याचा आरोपही सुष्मिता देव यांनी अलीकडेच केला होता.
अधीर रंजन चौधरी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अधीर रंजन चौधरी यांच्या विधानामुळे इंडिया आघाडीचे का होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इंडिया आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे, अशीही चर्चा रंगली आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि टीएमसी यांच्यात संघर्ष सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला फक्त दोन जागा देऊ केल्या होत्या. यावरून काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यानंतर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागांवर उमेदवारांची घोषणा केली.