“आम्हाला निवडणुका लढवता येतात”; जागावाटपावरुन काँग्रेसने तृणमूलला चांगलेच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 09:46 AM2024-01-24T09:46:54+5:302024-01-24T09:47:16+5:30

Lok Sabha Election 2024 TMC Vs Congress: लोकसभा जागावाटपावरून काँग्रेस आणि तृणमूलमधील संघर्ष टोकाला जाताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

congress adhir ranjan chowdhury slams tmc leaders over lok sabha election 2024 seat allocation | “आम्हाला निवडणुका लढवता येतात”; जागावाटपावरुन काँग्रेसने तृणमूलला चांगलेच सुनावले

“आम्हाला निवडणुका लढवता येतात”; जागावाटपावरुन काँग्रेसने तृणमूलला चांगलेच सुनावले

Lok Sabha Election 2024 TMC Vs Congress: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू प्रचाराला सुरुवात होत आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत. जागावाटपाचे फॉर्म्युले तयार केले जात आहेत. विरोधकांची इंडिया आघाडी भाजपाला टक्कर देण्याचा मानस घेऊन काम करत असली तरी जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला अवघ्या दोन जागा देण्याचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसने ठेवला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद टोकाला जाताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून काँग्रेस आणि तृणमूलमध्ये खटके उडताना दिसत असून, नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १० ते १२ लोकसभा मतदारसंघांची मागणी अवास्तव असल्याचे सांगून जागावाटपावरील चर्चेला उशीर केल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने काँग्रेसला फक्त दोन जागा देऊ केल्या आहेत. 

काँग्रेसने अनेकवेळा १०-१२ जागांची मागणी केली आहे

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूलचा बालेकिल्ला असलेल्या बीरभूम येथील पक्ष युनिटच्या संघटनात्मक बैठकीत याबाबत मार्गदर्शन केले. अंतर्गत बैठकीत ममता बॅनर्जींनी सदर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी तृणमूलच्या गरजेवर भर देत पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती देण्यात येत आहे. काँग्रेससोबत जागावाटपाच्या चर्चेचा विचार करण्याची गरज नाही, असे आमच्या पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले. पक्षाने दोन जागांची ऑफर दिली होती, परंतु काँग्रेसने अनेकवेळा १०-१२ जागांची मागणी केली आहे, अशी माहिती एका तृणमूल नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवरून दिली आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसही मागे हटण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणुका लढवल्या जाणार नाहीत. ममता बॅनर्जी ज्या जागा आम्हाला सोडणार आहेत त्या दोन्ही जागांवर काँग्रेस पक्षाने भाजपा आणि टीएमसीचा पराभव केला आहे. निवडणूक कशी लढवायची हे काँग्रेस पक्षाला माहिती आहे, असा पलटवार अधीर रंजन चौधरी यांनी केला.

 

Web Title: congress adhir ranjan chowdhury slams tmc leaders over lok sabha election 2024 seat allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.