मोदींना औरंगजेबाप्रमाणेच जवळच्या माणसांची भीती वाटतेय- काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 10:05 PM2018-06-27T22:05:31+5:302018-06-27T22:08:18+5:30
काँग्रेसकडून पुन्हा एकदा मोदींची तुलना औरंगजेबाशी
नवी दिल्ली: काँग्रेसनं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना मुघल बादशहा औरंगजेबाशी केली आहे. पंतप्रधान मोदींना आता औरंगजेबाप्रमाणे असुरक्षित वाटू लागलं आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदींवर थेट शरसंधान साधलं आहे. औरंगजेबच्या आयुष्यातील एक काळ असा होता की, त्याला जवळच्या व्यक्तींना भेटायचीदेखील भीती वाटायची, असं चतुर्वेदी म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचं वृत्त काल प्रसिद्ध झालं. त्यामुळे यापुढे मोदींच्या भेटीसाठी जाणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांना एसपीजी कमांडोंची परवानगी आवश्यक असेल. मोदींच्या जीवाला धोका असल्यानं त्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरुन काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदींवर निशाणा साधला. 'आता मोदींचे मंत्री आणि अधिकारी त्यांना एसपीजी कमांडोंच्या परवानगीशिवाय भेटू शकणार नाहीत. हे ऐकून औरंगजेबाची आठवण येते. औरंगजेबच्या आयुष्यातही कधीकाळी अशी स्थिती आली होती. त्यावेळी तो स्वत:च्या माणसांना भेटायला घाबरायचा,' अशा शब्दांमध्ये चतुर्वेदी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं, असंही चतुर्वेदी पुढे म्हणाल्या. 'सुरक्षेवर राजकारण होऊ नये. 2019 नंतरही मोदी राजकीय नेते राहावेत, अशी आमची इच्छा आहे. आम्ही इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारख्या नेत्यांना हल्ल्यांमध्ये गमावलं आहे. त्यामुळे याचं दु:ख काँग्रेसला माहित आहे,' असं चतुर्वेदी यांनी म्हटलं. याआधी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती.