मोदींची कोंडी करण्याचा काँग्रेसकडून पुन्हा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:41 AM2019-03-07T05:41:45+5:302019-03-07T05:42:01+5:30
पुलवामा हल्ल्याला भाजपा निवडणुकीचा बनवत असताना, काँग्रेसने राफेल विमान खरेदीच्या कथित घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदी यांची कोंडी करण्याचे ठरवले आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याला भाजपा निवडणुकीचा बनवत असताना, काँग्रेसने राफेल विमान खरेदीच्या कथित घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदी यांची कोंडी करण्याचे ठरवले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या वाटाघाटी तुकडीला बाजूला सारून, मोदी यांच्या सांगण्यावरून १२ व १३ जानेवारी, २०१६ रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी राफेल खरेदीची अंतिम बोलणी केली. त्याचे मोदी यांनी १३ जानेवारी, २०१६ रोजी करारात रूपांतर केले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी केला.
ते म्हणाले की, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १३ (१) डीनुसार मोदी व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन चौकशी व्हायला हवी. काँग्रेसने मांडलेल्या मुद्यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय परिणाम होईल हे सांगता येणार नाही.कदाचित न्यायालय ते विचारात घेऊ ही शकेल.
सूरजेवाला म्हणाले की, राफेलच्या किमतीवरून मोदी संसदेतच नव्हे, तर जनतेशीही खोटे बोलले. वाटाघाटी टीमच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे की, मोदींनी केलेल्या करारामुळे ३६ विमानांसाठी ७० हजार कोटी रूपये द्यावे लागणार असून, ही किंमत मोदी लपवत आहेत.
भारताच्या गरजांनुसार ज्या गोष्टी विमानात समाविष्ट केल्या, त्याची किंमत वेगळी मोजावी लागणार
आहे.
काय लिहिले अधिकाऱ्याने?
संरक्षण सचिवांनी फाइलवर २४ नोव्हेंबर, २०१५ रोजी लिहिले की, पंतप्रधान कार्यालय वाटाघाटी टीमला दूर सारून थेट व्यवहार करीत असल्याने टीमची स्थिती खूपच कमकुवत झाली आहे. परंतु, सचिवावर दडपण आल्यानंतर त्याने त्याच फाइलवर, पंतप्रधान कार्यालयाने खरेदीच्या अंतिम चर्चेत कोणताही हस्तक्षेप केला नाही, असे लिहून दिले.