नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बचावासाठी काँग्रेस पक्ष आक्रमकपणे थेट मैदानात उतरला असून, पक्षाच्या वेबसाईटवर प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. गांधी घराण्यास यंग इंडियन लिमिटेडकडून कुठलाही लाभ मिळालेला नाही, असा दावाही काँग्रेसने केला आहे.काँग्रेसने आपल्या संकेतस्थळावर ‘नॅशनल हेरॉल्ड’ या शीर्षकाखाली प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात सोनिया आणि राहुल गांधी यांना यंग इंडियनकडून आर्थिक लाभ मिळाला? यावर काँग्रेसने ‘नाही’ असे उत्तर दिले आहे. एजेएलकडून वायआयला कुठल्याही संपत्तीचे हस्तांतरण झाले का? यालाही काँग्रेसने नकारार्थी उत्तर दिले आहे. एजेएलची सर्व संपत्ती आणि उत्पन्न याच कंपनीचे असेल. एक पैसाही वायआय, वायआय संचालक वा वायआय भागधारकांकडे गेलेला नाही, असे काँगे्रसने स्पष्ट केले आहे. एजेएलची संपत्ती हडपण्यासाठी वायआयची स्थापना करण्यात आली, हा दावाही पक्षाने चुकीचा ठरवला आहे. असोसिएटेड जर्नल आणि यंग इंडियन या दोन्ही कंपन्या कायद्याच्या (१९५६) कलम २५ अंतर्गत स्थापन झाल्या आहेत. त्यांचे स्वरूप धर्मादाय स्वरूपाच्या कंपन्या असे आहेत, अशी स्पष्टोक्ती काँग्रेसने दिली आहे. वायआय ही एक रिअल इस्टेट कंपनी आहे, हा अर्थमंत्री अरुण जेटली यांचा आरोपही पूर्णत: निराधार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. हा दावा पूर्णत: चुकीचा आहे.
हेराल्डच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक
By admin | Published: February 08, 2016 3:22 AM