नवी दिल्ली - कर्नाटककाँग्रेसचे दिग्गज नेते आणि आमदार रोशन बेग यांना पक्षविरोधी कार्यवाही केल्या प्रकरणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीने पक्षविरोधी काम केल्यामुळे बेग यांच्यावर कारवाई केली आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने बेग यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील प्रस्ताव पक्ष नेतृत्वाकडे पाठवला होता. त्यानंतर बेग यांना तत्काळ पक्षातून निलंबित करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रोशन बेग यांनी पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच काँग्रेस पक्षाने मुस्लिमांना व्होट बँक म्हणून वापर केला. मुस्लीम लोकांच्या मनात एक भीती निर्माण केली. त्या भीतीच्या जोरावर काँग्रेसने मुस्लिमांकडून काम करून घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता.
बेग यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते सिद्धरमया यांच्याविरुद्ध वादग्रस्त टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बेग यांनी कर्नाटक निवडणूक प्रभारी आणि महासचिव केसी वेनुगोपाल, सिद्धरमया आणि प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्यावर निशाना साधला होता. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस सत्तेत आहे. काँग्रेसकडे अधिक जागा असून देखील जेडीएसला मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने ही चाल खेळली आहे.