नवी दिल्ली : रोहित वेमुला याची आत्महत्या, जेएनयूमधील घटना पाहता मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांना लक्ष्य ठरवत काँग्रेसने आक्रमक धोरण अवलंबणार असल्याचे संकेत दिले आहेत.अलीगड मुस्लीम विद्यापीठाशी संलग्न केंद्रांना आर्थिक मदत थांबविण्याचा निर्णय इराणी यांनी घेतल्याबद्दल काँग्रेसने जोरदार विरोध चालविला आहे. केंद्र सरकार अल्पसंख्यक आणि अल्पसंख्यक संस्थाविरोधी असून या सरकारने संसदेला स्पष्टीकरण द्यायला हवे, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. एएमयूचे मलाप्पुरम येथील केंद्र बेकायदेशीररीत्या स्थापन करण्यात आल्यामुळे सरकार निधी पुरविणार नाही, असे इराणी यांनी ८ जानेवारी रोजी केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी आणि खा. ई.टी. मोहम्मद बशीर यांच्याशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते. संपुआच्या काळात युजीसीने या केंद्राला ४५ कोटी रुपये दिले होते. रालोआ सरकारने निधी थांबविला आहे. मी याबाबत चंडी आणि बशीर यांच्याशी बोललो असल्याचे आझाद यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
स्मृती इराणींविरुद्ध काँग्रेस आक्रमक
By admin | Published: March 07, 2016 3:04 AM