Congress : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस १४ ते २९ नोव्हेंबरपर्यंत आंदोलन करणार; देशभर पदयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 08:19 AM2021-10-25T08:19:15+5:302021-10-25T08:19:51+5:30
Congress : देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत वाढत असून, करांच्या माध्यमातून सुरू असलेली ही लूट आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. निवडणुका झाल्या तरच यातून काही प्रमाणात सुटका होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या सतत वाढत चाललेल्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेस १४ ते २९ नोव्हेंबरपर्यंत आंदोलन करणार आहे, असे पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले. या आंदोलनात पदयात्राही असतील. या दोन आठवड्यांतील एक आठवडा संपूर्ण काँग्रेस समित्या देशभर त्या त्या भागात पदयात्रांत सहभागी होतील, असेही ते म्हणाले.
पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्याचा रविवार सलग पाचवा दिवस होता. राज्याराज्यांत या इंधनाच्या भावात फरक आहे ते तेथील स्थानिक करांमुळे. ५ मे २०२० पासून पेट्रोल ३५.९८ रुपये लिटर तर डिझेल लिटरमागे २६.५८ रुपये महाग झाले आहे. या वाढलेल्या किमतींवर पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रविवारी केंद्र सरकारवर टीका केली.
“मोदीजींच्या सरकारने जनतेला त्रास देण्यात विक्रम केला आहे. मोदी सरकार असताना टोकाची बेरोजगारी आहे, सरकारी मालमत्ता विकल्या जात आहेत त्या मोदी सरकार असताना, पेट्रोल, डिझेलचे दर वर्षभरात वाढले ते मोदी सरकार असताना,” असे गांधी ट्वीटरमध्ये म्हणाल्या.
...ही तर करांद्वारे लूट -राहुल गांधी
देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत वाढत असून, करांच्या माध्यमातून सुरू असलेली ही लूट आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. निवडणुका झाल्या तरच यातून काही प्रमाणात सुटका होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.