काँग्रेस, अकाली दल ‘आप’मुळे ‘झाडू’न साफ; लोकांना बदल हवा होता...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:07 AM2022-03-11T10:07:29+5:302022-03-11T10:07:47+5:30
काँग्रेस,अकाली दलाबद्दल मतदारांच्या मनात कमालीचा रोष होता. प्रस्थापितांना उखडून फेकण्यासाठी सरसावलेल्या सामान्य मतदारांनी पंजाबमध्ये चमत्कार घडवून आणला हे निकालाचे साधे सोपे विश्लेषण आहे.
- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंजाबमधील निवडणूक प्रचाराचे गरमागरम वातावरण कडाक्याच्या थंडीमध्ये अनुभवताना जे दिसत होते तेच निकालात समोर आल्याचे सिद्ध झाले. लोकांना बदल हवा होता आणि तो त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये शोधला.
काँग्रेस,अकाली दलाबद्दल मतदारांच्या मनात कमालीचा रोष होता. प्रस्थापितांना उखडून फेकण्यासाठी सरसावलेल्या सामान्य मतदारांनी पंजाबमध्ये चमत्कार घडवून आणला हे निकालाचे साधे सोपे विश्लेषण आहे. काँग्रेस अन् अकाली दल आलटूनपालटून सत्तेत येतात आिण एकमेकांच्या पापांवर पांघरूण घालतात, अशी आम भावना होती. दोघे एकमेकांना वाचवतात आणि आपल्या मतांचा वापर करून वर्षानुवर्षे सत्तेची गोड गोड फळे चाखतात हे ओळखलेल्या मतदारांनी ‘आप’ला साथ दिली.
कोट्यधीश ड्रग माफिया, वाळू माफिया, ट्रान्सपोर्ट माफिया यांच्याविरोधात आपण एकेकटे लढू शकत नाही, ही असहायता मतदारांना ‘आप’च्या दारात घेऊन गेली
एकमेकांशी ताळमेळ नसलेल्या नेत्यांमुळे काँग्रेसला दारुण पराभवास सामोरे जावे लागले. भांडखोर नेते सत्तेच्या मस्तीत राहिले आणि त्यांची सामान्य माणसांशी नाळ तुटत गेली. एकूणच पक्षातच आम आदमी असलेल्या ‘आप’ने प्रस्थापितांना प्रचंड हादरे देऊन सत्तांतर घडवून आणले.
‘प्रामाणिक बंदा’
तरुण पिढीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे गारुड असल्याचे जागोजागी दिसत होते. केजरीवाल पंजाबमधील भ्रष्टाचार मिटवतील, असा विश्वास लोकांना होता. केजरीवालांच्या अनेक साहसी निर्णयांचे अप्रूप पंजाबी जनतेच्या मनात होते. ते त्यांनी ‘आप’ला पसंती देण्यासाठी ईव्हीएममध्ये उतरविले.
बादलांच्या घराणेशाहीला धुडकावले
बादलांच्या घराणेशाहीला मतदारांनी पार धुडकावले. कृषी कायद्यांमुळे पंजाबात अप्रिय ठरल्याचा भाजपला फटका बसला. अकाली दलाच्या पदराखालून निघून भाजपने राज्यभरात निवडणूक लढविली. मात्र, त्यांना दोन आकडी संख्याही गाठता आली नाही.