भोपाळ- निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करणा-या काँग्रेसनं आता बोगस मतदारांवरून भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं मतदारयाद्यांत घोळ असल्याचा आरोप करत 60 लाख बोगस मतदार असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे. तसेच पत्रकार परिषद घेत काँग्रेसनं सर्व पुरावे सार्वजनिक केले आहेत.मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभा सदस्य कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला आहे. आम्ही मध्य प्रदेशातल्या 100 विधानसभा क्षेत्रातील पडताळणी केली आहे. ज्यात आम्हाला 60 लाख मतदार हे बोगस असल्याचं आढळलं आहे, असा दावा कमलनाथ यांनी केला आहे. मध्य प्रदेशची लोकसंख्या 24 टक्क्यांनी वाढली आहे. परंतु मतदारांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.मतदारांच्या संख्येतील हे आकडे बुचकळ्यात टाकणारे आहेत. तसेच या बोगस मतदारांची यादी जाणूनबुजून बनवल्याचा आरोपही कमलनाथ यांनी केला आहे. उत्तर प्रदेशशी जोडलेल्या काही भागातील मतदारांची नावे ही दोन्ही राज्यांमधील मतदार यादीत समाविष्ट केलेली आहेत. त्यामुळे नवी मतदार यादी बनवण्यात यावी, अशी मागणी कमलनाथ यांनी केली आहे. तसेच शेजारीत राज्यातील मतदारयाद्यांचीही पडताळणी झाली पाहिजे. हे सर्व भाजपानंच केले असल्यानं त्यांनी अद्याप कोणतीही तक्रार केलेली नसल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे. 60 लाख बोगस मतदार असल्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे सोपवल्याची माहितीही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे.
काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे पाच मागण्या केल्या आहेत. मतदार याद्यांची पुन्हा चौकशी करा, प्रत्येक निवडणूक अधिका-याकडून सर्टिफिकेट मागण्यात यावं. ज्यांनी मतदार याद्यांमध्ये बोगस नावं टाकली आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. पुढच्या यादीतही घोळ आढळल्यास अधिका-यांवर कारवाई व्हावी. तसेच अशा अधिका-यांना 6 ते 10 वर्षं कोणत्याही मतदार प्रक्रियेत सहभागी करून घेता कामा नये.मध्य प्रदेशात 60 लाख बोगस मतदार, पुरावे घेऊन काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव