पाटणा : विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यात अपयश आलेल्या कॉँग्रेसला पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले होते, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी(लोजपा)प्रमुख रामविलास पासवान यांनी खिल्ली उडविली.मंत्रिमंडळातील आपल्या सहकारी स्मृती इराणी यांचा अमेठीतून विजय होईल, अशी आशा आपण व्यक्त केली होती, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. पासवान म्हणाले की, २०१९ मध्ये पंतप्रधानपद रिक्त राहणार नाही, हे मी गेली ३ वर्षे सांगत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेतेपदासाठी प्रयत्न करावेत, असेही म्हणत असे. मात्र कॉँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळावे इतक्या जागासुद्धा मिळाल्या नाहीत. कॉँग्रेसला यंदा ५२ जागा मिळाल्या.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल टीका करताना राजद नेते तेजस्वी यादव यांनी ‘पलटू चाचा’ असा उल्लेख केला होता. त्याबद्दल पासवान यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या वयाचे आणि मानसन्मानाचे भान ठेवले पाहिजे होते, असे ते म्हणाले.
कॉँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळेना, रामविलास पासवान यांनी केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 3:45 AM