नवी दिल्ली : फेसबुकमधील असंख्य लोकांची माहिती चोरल्याचा आरोप असलेली केंब्रिज अॅनालिटिका ही भारतातही मोठ्या प्रमाणावर कामे केली आहेत. काँग्रेसनेही या कंपनीची सेवा घेतली होती अशी खळबळजनक माहिती केंब्रिज अॅनालिटिकाच्या संशोधन विभागाचा माजी संचालक ख्रिस्तोफर वायली याने ब्रिटनच्या पार्लमेंटसमोर साक्ष देताना दिली. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
वैयक्तिक माहितीचे रक्षण या विषयातील तज्ज्ञ पॉल आॅलिव्हर डेहाय यांनीही ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस आॅफ कॉमन्सच्या डिजिटल, संस्कृती, प्रसारमाध्यमे, क्रिडा या विषयाच्या समितीसमोर दिलेल्या साक्षीत म्हटले आहे की, काँग्रेस निवडणुकत हरावी म्हणून केंब्रिज अॅनालिटिकाची पालक कंपनी एससीएल ग्रुपला भारतातील एका अब्जाधीशाने पैसे दिले होते. एससीएल ग्रुपच्या निवडणुक विभागाचे माजी प्रमुख डॅन मुरेसन हे एका व्यक्तीचे काम करीत आहेत असे दाखवत होते पण प्रत्यक्षात त्यांना दुसऱ्या व्यक्तीनेच हे काम व त्याचा मोबदलाही दिला होता.
रविशंकर प्रसाद यांनी क्रिस्टोफर वाइलीच्या वक्तव्याचा हवाला देत स्पष्ट केले आहे की, काँग्रेसने केम्ब्रिज एनालिटिकाची सेवा घेतली. यातून हे स्पष्ट होते की, राहुल गांधी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस निराश झाल्यानेच अशा प्रकारे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते म्हणाले की, यापूर्वी कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर निक्स यांनीही भारतातील निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्याचा मुद्दा स्वीकारला होता. ते म्हणाले की, काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीत ज्या प्रकारे प्रचार केला होता त्यावरुन हे स्पष्ट होते की, आरोपी कंपनीची सेवा घेतली होती.
या सर्व आरोपांचे काँग्रेसचे प्रवक्त रणदीप सुरजेवाला यांनी मात्र खंडन केले असून, सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी. त्यातून सत्य समोर येईलच. पण सत्य समोर आल्यास आपण अडचणीत येऊ, अशी सरकारला भीती असल्यानेच केवळ आरोपांच्या फैरी झाडल्या जात असल्याचा टोलाही सुरजेवाला यांनी लगावला आहे.