काँग्रेस आणि दुष्काळ हातात हात घालून चालतात, मोदींची काँग्रेसवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 05:33 PM2018-01-16T17:33:31+5:302018-01-16T17:33:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहिल्या इको फ्रेंडली रिफायनरीचं उद्घाटन केलं आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहिल्या इको फ्रेंडली तेल रिफायनरीचं उद्घाटन केलं आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि दुष्काळ हातात हात घालून चालतात, अशी बोचरी टीका नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे. ते राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यातील रिफायनरीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, काँग्रेस प्रकल्पांच्या उद्घाटनाशिवाय काही करत नाही आणि फक्त मोठं मोठं बोलते. रेल्वे बजेटमध्ये काँग्रेसनं 1500हून अधिक घोषणा दिल्यात, त्या सगळ्या हवेतच विरल्या आहेत. वन रँक वन पेन्शनमध्ये काँग्रेसनं जवानांसोबत छळ केला होता. तत्कालीन काँग्रेसच्या सरकारनंही बजेटमध्ये फक्त दिखावा केला होता. 2022ला ज्या वेळी लोक 75 वर्षांच्या स्वातंत्र्याचं सेलिब्रेशन करत असतील, त्यावेळीच ही रिफायनरी कार्यान्वित होईल. मोदींनी यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरही स्तुतिसुमने उधळली आहेत. राजस्थान सरकार 40 हजार कोटी रुपये वाचवण्यात यशस्वी झालं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.
The Rajasthan refinery will be the first in the state, which is blessed with immense oil and gas reserves. This refinery will benefit Rajasthan, especially the industrious youth of the state.
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2018
राजस्थानातील बारमेर जिल्ह्यात असलेल्या पंचपदरा येथे ही तेल रिफायनरी बनवली जात आहे. राजस्थानमधील नागरिकांना हा प्रकल्प सुरू कधी होतो याची उत्कंठा लागून राहिली आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम राजस्थानात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. राजस्थान सरकार आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारणार आहे. हा प्रकल्प देशातील सर्वात मोठी गुंतवणूक असलेला प्रकल्प ठरणार आहे. राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यातील रिफायनरीवर जवळपास 43 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चार वर्षांमध्ये ही रिफायनरी तयार होणार असून, बीएस-6 या तंत्रज्ञानावर ती आधारित आहे.