सरन्यायाधीशांना हटवण्यासाठी काँग्रेस महाभियोग प्रस्ताव आणणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 08:48 AM2018-04-20T08:48:28+5:302018-04-20T08:48:28+5:30

अन्य विरोधी पक्षांच्या मदतीनं काँग्रेसची मोर्चेबांधणी

congress and other Opposition parties meet today for final call on CJI impeachment | सरन्यायाधीशांना हटवण्यासाठी काँग्रेस महाभियोग प्रस्ताव आणणार ?

सरन्यायाधीशांना हटवण्यासाठी काँग्रेस महाभियोग प्रस्ताव आणणार ?

Next

नवी दिल्ली: सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी काँग्रेसनं सुरु केली आहे. अन्य विरोधी पक्षांच्या मदतीनं महाभियोग प्रस्ताव आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल (गुरुवारी) फेटाळून लावल्या. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. 

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. आझाद विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन महाभियोग प्रस्ताव आणण्याबद्दल चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस, सीपीएम, सीपीआय, एनसीपी, समाजवादी पक्ष आणि बसप या पक्षांमधील खासदारांची भेट घेऊन आझाद प्रस्तावासाठी समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावावर आतापर्यंत 60 पेक्षा अधिक खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 

न्यायाधीश चौकशी कायदा, 1968 नुसार न्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी लोकसभेतील 100 किंवा राज्यसभेतील 50 खासदारांची स्वाक्षरी आवश्यक असते. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची चर्चा पहिल्यांदा जानेवारी महिन्यात झाली होती. सीपीएमचे सचिव सीताराम येचुरी यांनी सर्वप्रथम याबद्दल भाष्य केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी इतिहासात प्रथमच पत्रकार परिषद घेतल्यानंतर येचुरी यांनी महाभियोग प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रस्तावासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं त्यावेळी काँग्रेसनं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर हा प्रस्ताव बारगळला. 

Web Title: congress and other Opposition parties meet today for final call on CJI impeachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.