मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतात मोदींचे सरकार यावे, असे वक्तव्य केले आहे. काँग्रेस आणि पाकिस्तानची मिलीभगत असल्यामुळेच खान यांनी अशा प्रकारचे विधान केलेले आहे. पाकिस्तान मोदींना घाबरून आहे. पाकिस्तानला मोदींपासून धोका आहे, हे साऱ्या जगाला माहीत आहे. तरीही खान यांनी केलेले वक्तव्य म्हणजे काँग्रेसची खेळी असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी केला.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतात मोदी सरकार आल्यास चर्चा करता येईल, असे विधान केले होते. यावरून राजकीय आरोपप्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. या पार्श्वभूमीवर गोयल यांनी काँग्रेसला आरोपींच्या पिंजºयात उभे केले. खान यांचे वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि पाकिस्तानची खेळी आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी जवानांच्या कामावर, आमच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांचे राजकीय गुरू असलेले सॅम पित्रोदा हे दहशतवादासाठी पाकिस्तानला जबाबदार धरता येणार नसल्याचे विधान करतात. काँग्रेसने मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला उत्तर दिले नाही. मात्र आम्ही त्यांच्या घरात घुसून मारले त्यामुळे पाकिस्तान आज मोदींना घाबरत असल्याचेदेखील गोयल म्हणाले.
भाजपने आपल्या संकल्पपत्रात राम मंदिराची घोषणा केली. यावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गोयल म्हणाले, आमच्यावर टीका करणाºया काँग्रेसला मुळात राम मंदिर व्हावे असे वाटत नाही. काँग्रेसचे नेते मंदिर उभारणीत कायदेशीर अडसर आणतात, असा आरोप करतानाच भाजप सरकारच राम मंदिर बांधेल, असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक म्हणजे ५ वर्षे विरुद्ध ६५ वर्षे असा सामना आहे. एका इमानदार आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत बनवणाºया सरकारने पाच वर्षे पूर्ण केलीत. तसेच पाच वर्षांत आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या कामाचा रिपोर्ट दिला असून, आता आम्ही फायनल परीक्षेला उतरल्याचे त्यांनी सांगितले.