आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याची सुटका करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पक्षाचे सरचिटणीस व माध्यम प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, ९ सप्टेंबर २०१८ रोजी तत्कालीन भाजप, एआयएडीएमके सरकारने तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीव गांधींच्या सात मारेकऱ्यांची सुटका करण्याची शिफारस केली होती. पुरोहित हे भाजपचे माजी नेते आहेत व त्यांना मोदी सरकारने तमिळनाडूचे राज्यपाल केले होते. पुरोहित यांनी त्या वेळी कोणताच निर्णय घेतला नाही. त्यांनी हे प्रकरण राष्ट्रपतींकडे पाठविले होते. राष्ट्रपतींनीही कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्याच्या परिणामस्वरूप सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, भाजपचे माजी ज्येष्ठ नेते, पुरोहित राष्ट्रीय कार्यकारिणी व सरचिटणीस उपाध्यक्षही होते, त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही.
राष्ट्रपतींनीही कोणताही निर्णय घेतला नाही. हा विलंब पाहून व भारत सरकारनियुक्त राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी निर्णय न घेतल्यामुळे त्यांनी राजीव गांधी यांच्या एका मारेकऱ्याची सुटका केली.
केंद्र सरकारचा हाच राष्ट्रवाद आहे का?
- सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर आरोप करताना म्हटले आहे की, हाच मोदी सरकारचा राष्ट्रवाद आहे का? कोणताच निर्णय न घेणे हीच कामाची पद्धत आहे का? हा केवळ काँग्रेस नेत्यांचा सवाल नाही; कारण राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान होते.
- त्यांनी देशासाठी बलिदान केले. त्यांच्या मारेकऱ्यांना सध्याच्या सरकारने आपल्या हलक्या व छोट्या राजकारणासाठी सुटका करण्यासारखी स्थिती निर्माण केली, हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. तथापि, २०१८ मध्ये राहुल गांधी यांनी म्हटले होते की, मी व प्रियंका गांधी यांनी वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केले आहे.