नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयकावेळी शिवसेनेच्या खासदारांनी मोदी सरकारला साथ देत विधेयकाच्या बाजूने मतदान केले. सोमवारी उशिरा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० सदस्यांनी मतदान केले. मात्र विधेयकावर शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस नाराज झाल्याचं समोर आलं आहे. शिवसेना विधेयकाच्या मंजूरीसाठी मतदान करणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मग बाजूने मतदान का केलं हे माहित नाही असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले आहे.
नागरिकत्व विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेनेने मतदानापासून तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ शकली असती. शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही अशी नाराजी हुसेन दलवाईंनी बोलून दाखविली. समाजात फूट पाडण्यासाठी नागरिकत्व विधेयक आणलं गेलं आहे. बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक महत्त्वाचे प्रश्न देशासमोर आहेत. मात्र या मुद्दयांवर मार्ग काढण्यापेक्षा समाजात तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप हुसेन दलवाईंनी केला आहे. विधेयक संविधानाला धरुन नाही. भाजपा राज्यघटना मानत नाही असंही त्यांनी सांगितले.
मात्र याबाबत बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, आम्ही राष्ट्रहिताच्या दृष्टीने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाराष्ट्रात लागू आहे. जनहितासाठी राज्यात सत्तांतर झालं आहे. जनतेच्या विकासासाठी हा कार्यक्रम हाती घेतला आहे असं त्यांनी सांगितला.
तत्पूर्वी सामना अग्रलेखातून शिवसेनेने या विधेयकाविरोधात भाष्य केलं होतं. घुसखोरांना हाकला. नव्हे हाकलायलाच हवे, पण त्या बदल्यात इतर धर्मीय- त्यांत हिंदू बांधव आहेत- त्यांना स्वीकारण्याचे राजकारण देशात धर्मयुद्धाची नवी ठिणगी तर टाकणार नाही ना? हिंदूंना जगाच्या पाठीवर हिंदुस्थानशिवाय दुसरा देश नाही हे मान्य, पण नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ‘व्होट बँके’चे नवे राजकारण यातून कोणी घडवू पाहत असेल तर ते देशाच्या हिताचे नाही अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने टीका केली होती.