देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्यातील 182 मतदार संघांसाठी एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबर रोजी होईल. तसेच, अंतिम निकाल 8 डिसेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचीही मतमोजणी जाहीर होणार आहे. त्यानंतर, आता राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गुजरातमध्ये प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली आहे. मात्र, यंदा केजरीवालांच्या आपचीही एंट्री होत आहे.
आम आदमी पक्षही गुजरातच्या मैदानात उतरल्यामुळे यंदा तिहेरी लढत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, भाजपकडून सत्ता राखण्यासाठी तर काँग्रेसकडून सत्ता मिळवण्यासाठी जोराचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातच्या निवडणुकांची घोषणा होताच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आहे. खर्गे यांनी गुजरातमधील जनतेसाठीचा जाहीरनामाच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, जर गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, तर नागरिकांना ५०० रुपयांत एलपीजी सिलेंडर देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, ३०० युनीटपर्यंतचे वीजबील मोफत आणि १० लाख रुपयांपर्यंत उपचार आणि औषधेही देण्यात येणार आहेत.
भाजपची बैठक सुरू, २५ टक्के नवीन उमेदवार
गुजरात निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. यासाठी आता भाजप कोअर कमिटी आणि राज्य निवडणूक समितीच्या नेत्यांची राज्यातील पक्षाच्या मुख्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित आहेत. आजच्या बैठकीत प्रामुख्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या नावांवर चर्चा आणि छाननी करण्यात येत आहे. गुजरातमध्ये यावेळी भाजप विद्यमान आमदारांपैकी सुमारे 25 टक्के आमदारांची तिकिटे कापली जाणार आहेत. म्हणजेच एकूण 99 भाजप आमदारांपैकी सुमारे 23-25 आमदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात.