नवी दिल्ली - काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी आणखी 29 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. निवडणूकांची घोषणा झाल्यापासून काँग्रेसकडून उमेदवारांची जाहीर करण्यात आलेली ही दहावी यादी आहे. काँग्रेसने सोमवारी रात्री नववी यादी जाहीर केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. काँग्रेसने दहाव्या यादीत अमित शहांच्या विरोधातील उमेदवाराचे नाव घोषित केले आहे. काँग्रेसने 20 लोकसभा आणि ओडिशातील 9 विधानसभा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
काँग्रेसने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केलेल्या यादीत गुजरात, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, दादर आणि नगर हवेली आणि पंजाबमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीतून भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवाराची घोषणा काँग्रेसने केली आहे. अमित शहा हे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे, काँग्रेसने या मतदारसंघातून माजी आमदार डॉ. सी.जे चावडा यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे चावडा आणि अमित शहा हे एकाच गावचे जावई आहेत. चावडा आणि शहा यांचे लग्न पिलवाई या गावात झाले होते. विजापूर तालुक्यातील पिलवाई ही या दोन्ही उमेदवारांची सासरवाडी आहे.