नवी दिल्ली - काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध केली आहे. चौथ्या यादीत केरळमधील 12, उत्तर प्रदेशमधील 7, छत्तीसडमधील 5, अरुणाचल प्रदेशमधील 2 आणि अंदमान आणि निकोबारमधील एक अशा एकूण 27 उमेदवारांचा समावेश आहे. चौथ्या यादीमध्ये ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांना तिरुवनंतपुरम येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांना अरुणाचल प्रदेश पश्चिम येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यावेळी लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 एप्रिलला मतदानाची सुरुवात होणार असून, सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्ष विरुद्ध काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष अशी लढत रंगणार आहे.