नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. यामुळे मतदारांची पहिली पसंती असलेल्या आम आदमी पक्षाने पहिल्याच फटक्यात सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विद्यमान 46 आमदारांना तिकिट देण्यात आले असून 15 आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यानंतर, आता काँग्रेसने 54 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर, 11 फेब्रुवारी रोजी या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. त्यासाठी, आम आदमी पक्षाच्या 70 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसने 54 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये चांदणी चौकातून अलका लांबा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अरविंदरसिंग लव्हली यांना गांधी नगरचे तिकीट दिले आहे. तसेच द्वारकातून आदर्श शास्त्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, दिल्लीत काँग्रेस 70 पैकी 66 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर राजदला चार जागा सोडणार आहे. मात्र, यावर अद्याप उभय पक्षांचे एकमत झाले नाही. या संदर्भात उभय पक्षांकडून पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता दिल्लीतील जनतेचा संभाव्य कल सांगणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध झाले आहेत. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलमधून दिल्लीमध्ये आपचीची सत्ता कायम राहणार असल्याचा कल दर्शवला आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष पुन्हा एकदा मोठ्या बहुमतासह विजयी होणार असून, भाजपा आणि काँग्रेसला दोन आकडी जागाही जिंकता येणार नाहीत, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाने केलेल्या सर्व्हेमध्ये केजरीवाल जरी पंसती असले तरीही मतदार आमदारांवर नाराज असल्याचे पुढे आले होते.