नवी दिल्ली : स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मागणीसाठी तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) आमरण उपोषणाला बसले होते आणि त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. स्वतंत्र तेलंगणच्या मागणीपुढे संपुआ सरकार झुकण्यामागील हे कारण होते, असा खुलासा माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे.रमेश त्यांच्या ‘ओल्ड हिस्टरी अँड न्यू जिओग्राफी- बायफरकेटिंग आंध्र प्रदेश’ या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन झाले. या पुस्तकातील माहितीनुसार हैदराबादेतील परिस्थिती गंभीर असून, त्यात सुधारणेकरिता ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याची सूचना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना मिळाली होती. ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने आपल्या २४२ पानी पुस्तकात असे म्हटले आहे की, केसीआर यांची ढासळत चाललेली प्रकृती या निर्णयामागील एक मुख्य कारण होते. याशिवाय माओवादी आणि त्यांचे समर्थक परिस्थिती आणखी बिघडवतील अशीही शंका होती. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांना कुठल्या कारणाने त्या वेळी आंध्र प्रदेशात पुन्हा एकदा पोट्टू श्रीरामुलूसारखी स्थिती निर्माण झाली असल्याचे वाटले असावे. गेल्या वेळी आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेलेले जयराम रमेश हे आंध्र प्रदेशच्या विभाजनासाठी विधेयकाचा आराखडा तयार करण्याकरिता संपुआ सरकारद्वारे आॅक्टोबर २०१३ मध्ये स्थापित मंत्रिगटाचे सदस्य होते.स्वतंत्र आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे श्रीरामुलू यांचा १५ डिसेंबर १९५२ रोजी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या. नोव्हेंबर १९५६ साली स्वतंत्र तेलुगू भाषिक आंध्र प्रदेशची स्थापना करण्यात आली होती. फेब्रुवारी २०१४ मध्ये संसदेने तेलंगण आणि आंध्र प्रदेश अशा दोन राज्यांत त्याचे विभाजन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)बैठकीनंतर निर्णयचिदंबरम यांनी गुप्तचर संस्था आणि इतर अहवालांच्या आकलनानंतर तेलंगण स्थापनेच्या निर्णयासंबंधित वक्तव्य जारी केले होते. या निर्णयावर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी अखेरचा हात फिरविण्यात आला होता. या वेळी चिदंबरम, प्रणव मुखर्जी आणि आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री के. रोसय्या उपस्थित होते. त्यानंतर, काँग्रेसच्या इतर नेत्यांसोबत विचारविनिमय करण्यात आला.
काँग्रेसने घाबरून केली तेलंगणची घोषणा
By admin | Published: June 12, 2016 3:48 AM