चंदीगढ-कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात काँग्रेससमोर मोठं राजकीय संक उभ ठाकलं होतं. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नेत्यांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू होती. माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव जवळ-जवळ निश्चित मानलं जात होतं. पण, काँग्रेसने सर्व बड्या नेत्यांना बाजुला करत चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. पण, काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठीचं नवं नाव जाहीर केलं आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची विधीमंडळ गटनेते म्हणूनही निवड करण्यात आल्याचं काँग्रेस नेते हरीश रावत यांनी जाहीर केलं आहे. संध्याकाळी साडे सहा वाजता चेन्नी हे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन्याचा दावा करणार असल्याचं रावत यांनी सांगितलं आहे.
पक्षाच्या निर्णयावर रंधावा म्हणतात...
चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या पदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सुखजिंदर रंधावा यांनी आनंद व्यक्त केला आहे. मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, हायकमांडच्या निर्णयाबद्दल मी आनंदी आहे. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांचा मी आभारी आहे. चरणजीत सिंग चन्नी माझ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा असेल.
कोण आहेत चरणजीत सिंग चन्नी?
चरणजीत सिंग चन्नी हे रामदासिया ह्या शीख समाजाचे नेते आहेत. अमरींदरसिंग यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी औद्योगीक आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. चमकूर साहीब या मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 2015 ते 2016 दरम्यान ते पंजाबचे विरोधी पक्ष नेते होते.