नवी दिल्ली : अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी दिल्लीकाँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. सध्या दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेंद्र यादव यांना अंतरिम प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देवेंद्र यादव यांची दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
काही दिवसांपूर्वी अरविंदर सिंग लवली यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राजकारण तापले होते. अरविंदर सिंग लवली यांनी अनेक मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस पक्षावर अनेक गंभीर आरोप केले होते. अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र यादव यांना दिल्ली प्रदेशाध्यक्ष बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती.
देवेंद्र यादव हे पंजाबमधील काँग्रेसचे प्रभारीही आहेत. याआधी ते उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे प्रभारीही होते. तसेच, देवेंद्र यादव हे माजी अध्यक्ष अजय माकन यांचेही जवळचे असल्याचे बोलले जाते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष असणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना प्रदेशाध्यक्षांनी निवडणूक चिन्ह देणे बंधनकारक आहे. त्यामुळे देवेंद्र यादव यांना दिल्लीचे अंतरिम प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे.
दिल्लीत 25 मे रोजी मतदान 25 मे रोजी दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दिल्लीत आपसोबत झालेल्या करारानुसार काँग्रेसचे उमेदवार तीन जागांवर निवडणूक लढवत आहेत.