काँग्रेस आखतेय भाजपाच्या यशवंत सिन्हा यांच्या गुजरात दौ-याची योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 09:04 AM2017-11-02T09:04:19+5:302017-11-02T09:36:15+5:30
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा 14 नोव्हेंबरपासून तीन दिवस गुजरातच्या दौ-यावर आहेत. त्यांचा हा दौरा एनजीओ लोकशाही बचाओ अभियान अंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संबंधित एनजीओ काँग्रेस पक्ष समर्थित आहे.
अहमदाबाद : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा 14 नोव्हेंबरपासून तीन दिवस गुजरातच्या दौ-यावर आहेत. त्यांचा हा दौरा एनजीओ लोकशाही बचाओ अभियान अंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संबंधित एनजीओ काँग्रेस पक्ष समर्थित आहे. या पार्श्वभूमीवर यशवंत सिन्हा यांचा हा गुजरात दौरा नोटाबंदी आणि आताच्या आर्थिक परिस्थितीवर त्यांनी भाजपाविरोधी केलेल्या विधानानंतर काँग्रेससाठी लाभदायक असल्याचे मानले जात आहे.
यापूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीदेखील जीएसटीसंदर्भात राजकोटमधील व्यापा-यांसोबत संवाद साधला आहे. तर दुसरीकडे सिन्हादेखील नियोजित दौ-यादरम्यान राजकोट, अहमदाबाद आणि सूरतमधील व्यापा-यांसोबत संवाद साधणार आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, पी. चिदंबरम यांच्याप्रमाणेच यशवंत सिन्हा यांचा गुजरात दौरा हा काँग्रेसच्या बॅनर अंतर्गत होणार नसल्याची माहिती काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्यानं दिली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार यशवंत सिन्हा 14 नोव्हेंबरला अहमदाबादच्या ठाकोरेभाई देसाई हॉलमध्ये आणि 15 नोव्हेंबरला राजकोटमधील अरविंद मनियर हॉलमध्ये संवाद साधणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी जीएसटी निर्णयावरुन आपल्या पक्षाला घरचा अहेर दिला होता. जेव्हा भाजपा विरोधकांच्या भूमिकेत होती तेव्हा तत्कालीन सरकारवर 'टेक्स टेरेरिझम' आणि 'रेड राज' चा आरोप केले जायचे. मात्र आज जे काही सुरू आहे तेदेखील टेरेरिझमच आहे, असे विधान सिन्हा यांनी केले होते. नोटाबंदीचा निर्णय हा निव्वळ आर्थिक दहशतवाद होता. सरकारमधील नेते आकड्यांचा खेळ करत आहेत. मात्र अशा आकडेबाजीच्या खेळाने देशाचे भले होत नसते, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला होता.