"भाजपाने एक जरी जागा जिंकली तर राजकारण सोडेन"; काँग्रेस नेत्याचं जाहीर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 12:27 PM2021-10-14T12:27:58+5:302021-10-14T12:28:20+5:30
Congress Ashok Chandna And BJP : "राज्यातील आतापर्यंतच्या इतिहासात भाजपाला पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसइतक्या जागा कधीच जिंकता आलेल्या नाहीत आणि ते जिंकूही शकणार नाहीत" असंही चांदना म्हणाले आहेत.
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेत्याने थेट भाजपाला (BJP) जाहीर आव्हान दिलं आहे. राजस्थानचे क्रीडा मंत्री अशोक चांदना (Congress Ashok Chandna) यांनी "राज्यात पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला एकही जागा मिळाल्यास राजकारण सोडेन" असं मोठं विधान केलं आहे. "राज्यातील आतापर्यंतच्या इतिहासात भाजपाला पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसइतक्या जागा कधीच जिंकता आलेल्या नाहीत आणि ते जिंकूही शकणार नाहीत" असंही चांदना म्हणाले आहेत. राजस्थानमध्ये वल्लभनगर आणि धारियावाड मतदारसंघात 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत.
राजस्थानचे क्रीडा मंत्री अशोक चांदना यांनी "राज्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेस दोन्ही जागा जिंकेल आणि जर भाजपाने एकही जागा जिंकली तर ते राजकारण सोडतील" असं सांगितलं. तसेच "आजपर्यंतच्या राज्याच्या इतिहासात भाजपाला पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसइतके यश कधीच मिळाले नाही. राज्यात आतापर्यंत सहा विधानसभा जागांवर पोटनिवडणूक झाली असून त्यापैकी काँग्रेसने पाच आणि भाजपाने एका जागेवर विजय मिळवला आहे" असं चांदना यांनी म्हटलं आहे.
"जनता लोकविरोधी सरकारला धडा शिकवेल"
काँग्रेसच्या अशोक चांदना यांच्या या दाव्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते रामलाल शर्मा यांनी प्रत्युत्तर दिले. "निकाल जाहीर झाल्यावर मंत्र्यांचा अहंकार नक्कीच मोडून निघेल. जनता नक्कीच मंत्री चांदना यांच्या अहंकाराला आणि लोकविरोधी सरकारला धडा शिकवेल. तसेच लोकांचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीने 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा बहुमताने राजस्थानमध्ये सरकार स्थापन करेल" असा दावा शर्मा यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"आता मोदींच्या नावाने मतं मिळतील याची काही शाश्वती नाही"
केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी एक मोठं विधान केलं आहे. "भाजपाला तिसऱ्यांदा हरियाणामध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. संघर्ष करावा लागणार आहे. एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून राहून ते होऊ शकत नाही" असं विधान केलं आहे. ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते. राव इंद्रजित सिंह यांनी एकट्या मोदींच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नसल्याचं म्हटलं आहे. "नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आपल्यावर आणि राज्यावर आहे. पण त्यांच्या एकटयाच्या नावे मतं मिळतील याची काही शाश्वती नाही. मतदार मोदींच्या नावे मतं देतील असा आपला हेतू असू शकतो, पण हे सर्व तळागाळात काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. मतदान मत देतील हे त्यांच्यावरच अवलंबून आहे" असं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं आहे.