Ashok Gehlot : "काँग्रेसला राजस्थानमधील विजयाची शंका होती, पण..."; पराभवानंतर गेहलोतांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 15:30 IST2023-12-05T15:22:47+5:302023-12-05T15:30:40+5:30
Congress Ashok Gehlot : निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतरही अशोक गेहलोत म्हणतात की, "राजस्थानमध्ये सत्ताविरोधी लाट अजिबात नव्हती. सरकारने चांगले काम केले असून सर्वजण पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचं म्हणत होते."

Ashok Gehlot : "काँग्रेसला राजस्थानमधील विजयाची शंका होती, पण..."; पराभवानंतर गेहलोतांनी स्पष्टच सांगितलं
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, राजस्थानमध्ये त्यांना शंका होती, मात्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालं होतं, मात्र तसं झालं नाही. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस पक्षाचा भाजपाकडून पराभव झाला आहे.
"राजस्थानमध्ये सत्ताविरोधी लाट नव्हती"
निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतरही अशोक गेहलोत म्हणतात की, "राजस्थानमध्ये सत्ताविरोधी लाट अजिबात नव्हती. सरकारने चांगले काम केले असून सर्वजण पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचं म्हणत होते. भाजपाच्या विजयामागे खोटा प्रचार हे प्रमुख कारण आहे. भाजपा विकास आणि सरकारी कामावर बोलण्याऐवजी कन्हैया लालच्या मुद्द्यावर खोटं बोलली. हे भाजपाच्या मोठ्या नेत्यांना शोभत नाही. निवडणुका खोट्याच्या आधारे लढल्या गेल्या."
"पराभवाच्या दु:खापेक्षा देशाची जास्त चिंता आहे. लोकशाही धोक्यात आहे." यासोबतच गेहलोत यांनी आपण राजकारणातून ब्रेक घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचेही स्पष्ट केले असून त्यांनी आपले पुढील लक्ष्यही ठेवले आहे. "मी एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे जनतेची सेवा करत राहीन. लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करावी, असं आवाहन मी सर्वांना केलं आहे" असं सांगितलं.
"मला आशा आहे की भाजपा सरकार..."
राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले असून लवकरच सरकार स्थापन होणार आहे. यावर गेहलोत यांनी भाजपाला आवाहन करत भाजपा सरकार जुनी पेन्शन योजना सुरू ठेवेल आणि चिरंजवी योजना 50 लाख रुपयांपर्यंत वाढवेल अशी आशा आहे. सरकारी तिजोरी नेहमीच भरलेली असते, असंही अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.