UP Election 2022: “BJP ने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही”; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 08:58 AM2021-10-20T08:58:50+5:302021-10-20T09:02:24+5:30
UP Election 2022: राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी यानंतर भाजपवर टीका केली आहे.
जयपूर: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर काँग्रेसने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (Congress) सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केली आहे. या घोषणेचे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी स्वागत केले आहे. यावरून आता राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी यानंतर भाजपवर टीका केली आहे. भाजपने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही, असे म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा प्रियंका गांधी यांनी जाहीर केलेला निर्णय अतिशय स्तुस्त्य असून, त्याचे स्वागत करतो. काँग्रेसने देशाला महिला पंतप्रधान, राष्ट्रपती दिल्या आहेत. महिला सशक्तीकरणाचे ध्येय घेऊन जाणारा काँग्रेस सर्वांत जुना पक्ष आहे, असे अशोक गेहलोत म्हणाले.
भाजपने आजपर्यंत कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही
भाजपने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही. भाजपच्या विरोधी विचारधारेमुळे उत्तर प्रदेशमध्ये महिला असुरक्षित आहेत, असा दावा गेहलोत यांनी केला आहे. तसेच महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे कुशासन संपुष्टात आणण्याचे काम काँग्रेस करेल, असा विश्वास गेहलोत यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन महिलांना राजकारणात मोठी संधी उपलब्ध करुन दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस पक्षाने महिलांना राजकारणात आणखी महत्वाची संधी देण्याचे पाऊल उचचले आहे, असे गेहलोत म्हणाले.
दरम्यान, पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत विधानसभा निवडणुका होतील, असे म्हटले जात आहे. सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४०३ जागांवर विजय मिळाला होता. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर, काँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले होते.