शीलेश शर्मा नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर लगेच हल्ला करून त्यांना १० प्रश्नांची उत्तरे मागून तुम्ही खोटे बोलत आहात, असा आरोप केला. हा आरोप आणि प्रश्नांचा थेट संबंध हा भाजप-जनता दल (यु) सरकारच्या कामकाजाबद्दल तयार केलेल्या आरोपपत्राशी आहे.
काँग्रेसने मोदी यांना विचारले की, केंद्र सरकार बिहारला विशेष राज्याचा दर्जा का देत नाही, ऊजार्मंत्री आर. के. सिंह यांनी बिहारच्या या मागणीला फेटाळून का लावले, त्यांची ही भूमिका तुम्हालाही मान्य आहे का? पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला, पवन खेडा यांनी दुसरा प्रश्न विचारला की, गेल्या निवडणुकीत ५०० कोटी गुंतवणुकीतून भागलपूरमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा झाली होती त्याचे काय झाले? बिहारला खोटी आश्वासने का? २०१५ मध्ये कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले? बक्सरच्या चौसात १० हजार कोटी रुपये गुंतवणुकीतून होणाऱ्या १३०० मेगावॅट थर्मल पॉवर प्लांटचे पुढे काय झाले?
मनिहारी ते साहिदगंज पूल का? नाही? बनला? कारण त्याची घोषणा तर त्यांनी स्वत:च केली होती. चार हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा चार पदरी रस्ता का तयार झाला नाही? तुमची आश्वासने खोटी का? अशा अनेक आरोपांचे हे पत्र पक्षाने महागठबंधनकडून तयार करून घेतले आहे. ते प्रचारात मतदारांत वाटले जाईल म्हणजे त्यातून हे सिद्ध होईल की, मोदी खोटी आश्वासने देतात.