संघाच्या कृपेशिवाय भाजपा नेत्यांना मिळत नाहीत पदे, काँग्रेसचा प्रतिहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 03:29 AM2019-03-21T03:29:17+5:302019-03-21T03:29:29+5:30
संघाचा आशीर्वाद असल्याशिवाय भाजपातील कोणालाही पंतप्रधान, मंत्री, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री आदी महत्त्वाची पदे मिळत नाहीत, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी लगावला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून त्या संघटनेच्या आशीर्वाद असल्याशिवाय भाजपातील कोणालाही पंतप्रधान, मंत्री, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री आदी महत्त्वाची पदे मिळत नाहीत, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी लगावला.
काँग्रेसच्या घराणेशाहीवर मोदीनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सिब्बल म्हणाले की, घराणेशाहीबद्दल वक्तव्ये करण्यापेक्षा मोदींनी आत्मपरीक्षण करावे. जनतेला भेडसावत असलेल्या प्रश्नांची उकल करण्याकडे लक्ष द्यावे. संघपरिवार हा जगातील सर्वात मोठा परिवार व घराणे आहे. शेतीची समस्या गंभीर बनली आहे. देशात सर्वत्र बेकारांचे तांडे निर्माण झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई, शिक्षण, आरोग्य, प्रदूषणाच्या अक्राळविक्राळ समस्या समोर आहेत. त्या सोडविण्यासाठी मोदींनी प्रयत्न करायला हवेत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात मोदी इतके मग्न आहेत की त्यांना जनतेला सपशेल विसर पडला आहे.
बेरोजगारीसाठी चौकीदारच जबाबदार
देशातील ४.७ कोटी युवकांच्या हातातील रोजगार हिसकावून घेण्यास चौकीदार मोदी जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. भारतातील पुरुष मजूर, कर्मचारी यांच्या संख्येत १९९३-९४ नंतर पहिल्यांदाच गेल्या वर्षात मोठी घट झाली आहे. पाच वर्षात मोदी यांनी अनेकांच्या हातचा रोजगार काढून घेतला आहे, असेही ते म्हणाले.