2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, काँग्रेसने मणिपूरमधील हिंसाचारावरून सत्ताधारी पक्ष भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने मणिपूरचा मिक्स्ड मार्शल आर्ट्स फायटर चुंगरेंग कोरेन यांचा एक व्हिडीओ शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. "पंतप्रधान मोदी मणिपूरचं दु:ख समजू शकले असते तर ते मणिपूरला गेले असते" असं काँग्रेसने म्हटलं आहे.
फायटर चुंगरेंग कोरेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातीय हिंसाचाराने प्रभावित झालेल्या मणिपूरला भेट देण्याचे आवाहन करत आहे. हे आवाहन करताना तो भावूक झालेला दिसतो. त्याने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
"एकदा मणिपूरचा दौरा करा"
"मला एक गोष्ट सांगायची आहे. ही माझी मोदीजींना नम्र विनंती आहे, मला माझ्या बाजूने एक संदेश द्यायचा आहे की, मणिपूरमध्ये हिंसाचार होत आहे. जवळपास एक वर्ष झालं आणि दररोज लोक मरत आहेत. किती लोक मदत छावण्यांमध्ये राहत आहेत आणि अन्नधान्य उपलब्ध नाही. मुलांना नीट शिक्षण घेता येत नाही. भविष्याबाबत आम्हाला खूप चिंता वाटत आहे. तुम्ही एकदा मणिपूरचा दौरा करा" असं चुंगरेंग कोरेन याने म्हटलं आहे.
काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मे 2023 पासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारात 200 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि सुमारे 50 हजार लोक विस्थापित झाले आहेत. जातीय हिंसाचाराचं अराजकतेत रूपांतर झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.