नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एका घटनेमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवराज सरकारमध्ये (Shivraj Government) मंत्री असलेल्या कुंवर विजय शाह यांचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मंत्री कुंवर विजय शाह एका मुलीकडे लक्ष ठेवण्याबद्दल एका महिला अधिकारीला सांगत आहेत. याच दरम्यान त्यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठा गदारोळ झालेला पाहायला आहे. "ही विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, म्हणून हिच्याकडे लक्ष द्या" असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून काँग्रेसनेही त्यावर टीकेची झोड ठवली आहे.
मंत्री कुंवर विजय शाह यांनी महिला अधिकाऱ्याला ही मुलगी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, त्यामुळे हिच्याकडे लक्ष द्या असं म्हटलं आहे. गुरुवारी मध्य प्रदेशचे वनमंत्री कुंवर विजय शाह (Kunwar Vijay Shah) नरसिंहपूरच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान एके ठिकाणी मंत्री नागरिकांच्या समस्या ऐकत होते. त्यावेळी एक विद्यार्थिनी स्वत:ची अडचण घेऊन त्यांच्या जवळ आली. तेव्हा मंत्री शाह यांनी उपस्थित महिला अधिकारीला तिची समस्या नोंदवून घ्यायला सांगितलं.
समस्या सांगण्यापूर्वी मंत्र्यांनी विद्यार्थिनीला तिचं नाव विचारलं. ज्यानंतर विद्यार्थिनीने आपलं नाव शिवानी किरार असल्याचं सांगितलं. जसं विद्यार्थिनीने आपलं नाव सांगितलं त्यानंतर मंत्र्यानी विद्यार्थिनीच्या नावाचा उल्लेख करीत ती मुख्यमंत्र्यांच्या जातीचं असल्याचं महिला अधिकारीला सांगितलं. म्हणून हिची काळजी घ्या. मंत्र्यांच्या या विधानानंतर तिथे उपस्थित असलेले अनेक अधिकारी हसू लागले. ज्यानंतर मंत्री देखील आपलं हसू रोखू शकले नाही. या दरम्यान तेथे उभे असलेल्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.
कुंवर विजय शाह यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या या विधानावरून हल्लाबोल केला आहे. मध्य प्रदेशची प्रत्येक व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या जातीची असती तर... असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. नरेंद्र सलूजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत जोरदार टीका केली आहे. "मध्य प्रदेशची प्रत्येक व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या जातीची असती तर किंवा मग प्रत्येकाने आपल्या नावासमोर मुख्यमंत्र्यांच्या जातीचा उल्लेख केला तर राज्यातील मंत्री त्यांच्याकडे अशाच प्रकारे विशेष लक्ष ठेवतील?" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.