लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकऱ्यांत मोदी सरकारविषयी असंतोषाची लाट आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातला शेतकरी संप पुकारून रस्त्यावर उतरला आहे. दोन्ही ठिकाणी सरकार भाजपाचे आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांच्यावर बेछूट लाठीमार होत आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती आहे, असे उद्गार राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काढले. ते म्हणाले, आमच्या काळात आम्ही शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी हरतऱ्हेचे निर्णय घेतले. उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळवून देण्याचे आश्वासन मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. पण तीन वर्र्षात ते खोटे ठरल्याने दरवर्षी १२ हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत.मोदी सरकारची तीन वर्षांची कारकीर्द निराशाजनक आहे, असो काँग्रेस कार्यकारिणीचे मत असल्याचे नमूद करीत आझाद म्हणाले, या ३ वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने भीती, दडपण, तणाव आणि निराशेशिवाय दुसरे काहीच दिले नाही. दलित, तरुण, महिला, अल्पसंख्य हे सारेच सरकारच्या धाकदपटशाचे शिकार ठरले आहेत. अल्पसंख्य समुदाय दहशतीत वावरत आहे. महिलांवरील अत्याचारांच्या व गुन्हेगारीच्या घटनांमधे तब्बल ३0 टक्के वाढ झाली आहे. पाच वर्षांत १0 कोटी रोजगार पुरवण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने तीन वर्षांत जेमतेम ३ लाख रोजगार निर्माण केले. असंघटीत, संघटीत क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी होण्याबरोबर, पायाभूत सोयी आणि बांधकाम क्षेत्रातले लाखो लोक बेरोजगार झाले. नोटाबंदीला काँग्रेसने कडाडून विरोध केला होता. सकल राष्ट्रीय उत्पन्नावर या निर्णयाचा भयंकर प्रभाव पडेल असे माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांनी बजावलेही होते. सरकार मात्र स्वयंघोषित पद्धतीने नोटाबंदीचे लाभ देशाला ऐकवत सुटले. आता या निर्णयाच्या गंभीर परिणामांचे वास्तव लोकांसमोर येते आहे.>प्रसारमाध्यमांवर सरकारच्या धाकदपटशाचा अनुभव घेतलामोदी सरकारची भलामण न करता स्वतंत्रपणे पत्रकारिता करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर सरकार कशा प्रकारे धाकदपटशाचा अवलंब करते, त्याचे उदाहरण गेल्या २४ तासांत आपण सर्वांनी अनुभवले आहे.एनडीटीव्हीवरील धाडींचा नामोल्लेख न करता आझाद म्हणाले, राष्ट्रीयीकृत बँकांची ६ लाख कोटींची रक्कम काही निवडक लोकांकडे थकबाकीच्या स्वरूपात पडून आहे.त्याबाबत कारवाई करण्याऐवजी एका खासगी बँकेच्या वादग्रस्त वसुलीचे निमित्त पुढे करीत एका वृत्तवाहिनीवर धाडी टाकण्याचा प्रयोग सरकारने करून दाखवला. दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग आणि इतर ज्येष्ठ नेते.
काँग्रेसने केला हल्लाबोल; मोदी सरकारने भीती, दडपण याशिवाय जनतेला काय दिले?
By admin | Published: June 07, 2017 6:09 AM