मोदींचा 'तो' व्हिडिओ दाखवून काँग्रेसनं 'डॉलर'वरून धरली सरकारची 'कॉलर'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 05:56 PM2018-06-29T17:56:18+5:302018-06-29T17:57:42+5:30
स्वीस बँकेतील भारतीयांचा पैसा ५० टक्क्यांनी वाढलाय. डॉलरची किंमत ६८.७९ रुपये झालीय. त्यावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर शरसंधान केलंय....
नवी दिल्लीः डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य आत्तापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आलं असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ दाखवून काँग्रेसनं सरकारची 'कॉलर' धरली आहे. यूपीए सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चालल्याचा आरोप करणारे आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे उत्तर मागणारे मोदी आता स्वतः उत्तर देणार का?, असं आव्हान काँग्रेसनं दिलं आहे.
स्वीस बँकेतील काळा पैसा मायदेशी आणण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. पण, स्वीस बँकेतील भारतीयांचा पैसा ५० टक्क्यांनी वाढल्याचा आकडा समोर आला आहे. गेल्या वर्षभरात स्वीस बँकेतील भारतीयांच्या ठेवी ७ हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याचं चित्र आहे. दुसरीकडे, रुपयाची घसरगुंडी सुरूच आहे. एका डॉलरची किंमत ६८.७९ रुपये झालीय. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याचीही भीती निर्माण झालीय. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते आरपीएन सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर शरसंधान केलं.
काँग्रेसनं नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ स्क्रीनवर दाखवला. त्यात मोदी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे रुपयाच्या अवमूल्यनाबद्दल उत्तर मागताहेत. 'डॉलर मजबूत आणि रुपया कमकुवत होत असल्याचं चित्र आज पाहायला मिळतंय. ते असंच राहिलं तर जागतिक बाजारपेठेत भारत टिकू शकत नाही. व्यापाऱ्यांचं आणि सरकारचंही त्यात नुकसान आहे. पण दिल्लीचं सरकार उत्तरं देत नाही. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकेच्या चलनाला डॉलरच्या तुलनेत काहीच फटका बसत नाही, मग भारताचा रुपयाच का पडतोय? भ्रष्ट राजकारणामुळेच हे झालंय', असा आरोप मोदी या भाषणात करताहेत. आता तशीच परिस्थिती राओला सरकारच्या काळात निर्माण झाली आहे. त्यामुळे मोदींनी मनमोहन यांना विचारलेले प्रश्नच आता काँग्रेसनं मोदींना विचारलेत.
LIVE: Press briefing by @INCIndia spokesperson @SinghRPN. https://t.co/9PAkANKjCI
— Congress Live (@INCIndiaLive) June 29, 2018
रुपयाच्या घसरणीचा काय होईल परिणाम?
१. डॉलर महागल्याचा पहिला फटका खनिज तेलाला बसतो. खनिज तेल खरेदी करण्यासाठी भारतीय कंपन्यांना अधिक रक्कम मोजावी लागेल. त्यातून पेट्रोल-डिझलचे भाव वाढतील.
२. इंधन महागल्याने मालवाहतूक महाग होऊन दैनंदिन गरजेचा भाजीपाला, धान्यांच्या किमती वधारू शकतात.
३. भारतीयांचा विदेश प्रवासही महाग होऊ शकतो.