आधी नीट आणि नंतर नेट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस आज देशभरात आंदोलन करणार आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते देशातील अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहेत. मध्य प्रदेशातील NEET, नर्सिंग घोटाळा, विविध परीक्षांमधील पेपरफुटी याप्रकरणी भोपाळमध्ये काँग्रेस पक्ष आंदोलन करणार आहे. दिग्विजय सिंह, जितू पटवारी यांच्यासह अनेक नेते या निदर्शनात सहभागी होणार आहेत. देशातील इतर राज्यांतही काँग्रेस आंदोलन करणार आहे.
भाजपमध्ये मोठे बदल?; पहिले राज्यात; नंतर देशातही परिवर्तनाचे वारे वाहणार!
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पेपरफुटीला हास्यास्पद म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल गुरुवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. भारतात सातत्याने पेपर लीक होत आहेत आणि नरेंद्र मोदी हे थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले. भाजपशासित राज्ये ही पेपरफुटीची केंद्रे आणि शिक्षण माफियांची प्रयोगशाळा बनली आहेत. भाजप सरकार शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून तरुणांच्या भवितव्याशी खेळत आहे. इंडिया आघाडी हे कधीही होऊ देणार नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी रशिया-युक्रेन, इस्रायल-गाझा युद्ध थांबवतात, पण पेपर लीक थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत. भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी शैक्षणिक संस्था ताब्यात घेतल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. ही परिस्थिती बदलल्याशिवाय पेपरफुटी थांबणार नाही, असंही गांधी म्हणाले.
पेपरफुटीच्या मुद्द्यावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल गुरुवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते म्हणाले होते की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे कल्याण हे आमचे प्राधान्य आहे. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जे काही समोर आले आहे, त्याचा तपास सुरू आहे. शिक्षणमंत्री या नात्याने मी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेतो. आम्ही सुधारणेसाठी तयार आहोत. कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही.