Congress Attacks PM Modi : अदानी प्रकरणावरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात याच मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. दरम्यान, आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षांसोबत काँग्रेसने तिरंगा मार्च काढला. यानंतर पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी ते म्हणाले, 'मोदी सरकार लोकशाहीच्या बाता मारतात, पण लोकशाहीला महत्त्व देत नाही. अडीच वर्षांत अदानींची 12 लाख कोटी कशी झाली? 50 लाख कोटींचा अर्थसंकल्प अवघ्या 12 मिनिटांत कसा मंजूर झाला. हे प्रश्न आम्ही त्यांना नेहमी विचारले, पण आम्हाला त्यांनी नोटीशी दिल्या. आम्हाला अधिवेशनात बोलूच दिले नाही."
खर्गे यांनी यावेळी केंद्र सरकारला प्रश्न विचारला की, 'सरकार इतक्या साऱ्या गोष्टी एकाच उद्योगपतीला का देत आहे? तुम्ही त्यांना विमानतळे, रस्ते, बंदरे, रेल्वे दिलीत. यावरून सरकारला एकाच माणसाला श्रीमंत का करायचे आहे? असा प्रश्न निर्माण होतो. मी 50-52 वर्षांपासून राजकारणात आहे, पण अशी वेळ यापूर्वी कधीच पाहिली नव्हती,' असी टीकाही त्यांनी यावेळी केली.
संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेससह इतर विरोधी पक्षनेत्यांनी विजय चौकापर्यंत तिरंगा मोर्चा काढला. या मोर्चाद्वारे विरोधकांनी अदानी प्रकरणाविरोधात जेपीसीची मागणी केली. या मोर्चात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित होते.